नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी देणारा ई-मेल ‘एनआयए’ला (राष्ट्रीय तपास यंत्रणा) प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. ‘किल नरेंद्र मोदी’ असा तीन शब्दांचा हा मेल आहे. गृह मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांसाठी असलेल्या विशेष सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.
शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी हा मेल प्राप्त झालेला असून, यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, ‘एनआयए’ने या मेलच्या पडताळणीसाठी कुठलीही प्राथमिक चौकशी केलेली नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीला आली आहे. ‘एनआयए’ने गृह मंत्रालयाला याबाबत पत्र तेवढे पाठविले. ‘टाईम्स नाऊ’ने तसे वृत्त देऊन खळबळ उडवून दिली आहे.
‘एनआयए’ला एका ई-मेल आयडीवरून काही उच्चपदस्थ, मान्यवर तसेच यंत्रणा प्रमुखांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. मेलमधील मजकुराची प्रत सोबत जोडलेली आहे आणि संबंधित यंत्रणांनी योग्य ती कारवाई यासंदर्भात करावी, असे पत्र स्वत: तपास यंत्रणा असलेल्या ‘एनआयए’ने पुढे रवाना केले होते.
दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी तपास यंत्रणांचे समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्यात रॉ, आयबी, सुरक्षा, गुप्तचर यंत्रणांसह ‘एनआयए’ला सहभागी करून घेण्यात आले आहे. ई-मेलमागील घटक हे देशाबाहेरील असल्याचे निष्पन्न झाले आहे.