मुंबई :
अंतिम वर्षांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होईल तसेच 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना या परीक्षा घरी बसून देण्यास राज्यपाल सकारात्मक असून, यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, असेही सामंत म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय आणि ‘यूजीसी’ने परीक्षा घेणे बंधनकारक केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि कुलगुरू समितीची बैठक पार पडली.
राज्यपालांसमवेत झालेल्या कुलगुरू बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.
या बैठकीत अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, यावर चर्चा झाली. 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या परीक्षा घरी बसून देता येणार आहेत. लेखी परीक्षेप्रमाणे प्रॅक्टिकल परीक्षेलाही त्यांना महाविद्यालयामध्ये जावे लागणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झाली नसली, तरी लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसांत शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासंदर्भातील तयारी पूर्ण करावी. याबरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.