अकोला – जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवासांपासून पडत असलेला रिमझिम पाऊस, अधूनमधून तापणारे उन आणि ढगाळ वातावरण तुडतुडयांच्या प्रादुर्भावास पोषक असून कपाशी पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे, फिक्कट हिरव्या रंगाचे असून तिरकस चालतात. प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहुन रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात. पाने आतल्या बाजूने वळतात. काही दिवसांनी पानांच्या कडा लालसर होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाची पूर्ण पाने लाल होतात. आणि जळल्यासारखी दिसतात. यालाच हॉपर बर्न असेही म्हणतात.
काही ठिकाणी कपाशी वर फुलकिड्याच्या देखील प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या मागील बाजूस शिरेजवळ राहुन पान खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. फुलकिड्यांनी खरवडलेल्या भागावर पांढुरके चट्टे पडतात. उन्हात तो भाग चमकतो. प्रादुर्भाव असल्यास पाने कडक होतात आणि फाटतात. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येतो. झाड निस्तेज दिसते आणि वाढ मंदावते.
कपाशी वरील तुडतुडे आणि फुलकिड्यांच्या व्यवस्थापनाकरीता नत्र खताचा वापर शिफारसीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा, पाच टक्के निंबोळी अर्काची किवा अझाडीराक्टीन 1500 पिपिएम 50 मिली किवा अझाडीराक्टीन 3000 पीपीएम 40 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे. किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास(2 तुडतुडे प्रती पान, 10 फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. त्याकरिता प्रोफेनोफॉस 50 इसी 20 मिली (एकरी 400 मिली) किवा बुप्रोफेझीन 25 एस सी 20 मिली (एकरी 400 मिली) किवा फ्लोनिक अमीड 50 डब्ल्यू डी जी 4 ग्राम प्रमाणे योजना करावी. यापैकी कोणत्याही एका कीटक नाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. चारुदत्त ठिपसे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.