नवी दिल्ली :
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याची माहिती लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयाकडून सोमवारी देण्यात आली होती. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कोमामध्ये होते. रविवारी सायंकाळपासून मुखर्जी यांची प्रकृती जास्त खराब झाली होती.
तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. 2012 ते 2017 या काळात देशाचे 13 वे राष्ट्रपती राहिलेल्या 84 वर्षीय मुखर्जी यांची तब्येत 10 ऑगस्ट रोजी बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच्या एक दिवस आधीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मेंदूत झालेल्या गुठळ्या काढण्यासाठी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर मुखर्जी कोमात गेले होते. त्यानंतर ते शुद्धीत आले नाहीत.
प्रणव मुखर्जी यांना २६ जानेवारी २०१९ रोजी भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती राहिले. काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने त्यांना उमेदवारी दिली होती. घोषित केला. थेट लढतीमध्ये त्यांनी पी.ए. संगमा यांचा पराभव केला होता. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी तेरावे राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील किर्नाहर शहरालगत मिराटी गावच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील १९२० पासून काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्यांनी १९५२ ते ६४ या कालावधीमध्ये पश्चिम बंगाल विधानपरिषदेचे सदस्य आणि वीरभूम (पश्चिम बंगाल) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. प्रणव मुखर्जी यांनी सुरी (वीरभूम) येथील सुरी विद्यासागर महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतले.