मुंबई :
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंर राज्य सरकारकडून परिक्षा घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा असणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीसाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होईल. त्यानंतर कुलगुरुंच्या विनंतीनुसार मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत.
पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठांकडून ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर काही विद्यापीठांकडून १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.