नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ३० ऑगस्टला आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. मात्र मोदींची ही मन की बात जनतेला काहीशी खटकलेली दिसत आहे. त्याचा परिणाम सध्या मन की बातच्या यूट्यूबवरील व्हिडीओवर दिसून येत आहे.मन की बात हा कार्यक्रम यूट्यूबवर प्रसारित करण्यात आल्यानंतर त्याला मोठ्या संख्येने लोकांनी नापसंती दर्शवली आहे. म्हणजेच या व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक अधिक मिळाले आहेत.या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी व्हिडीओला नापसंती दर्शवणाऱ्यांची संख्या सार्वधिक आहे. ३१ ऑगस्टला सकाळी ११.३० पर्यंत भाजपच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर या व्हिडीओला ४९ हजार लाईक तर ३ लाख ७७ हजार लोकांनी डिसलाईक केले आहे.तसेच मोदींच्या अधिकृत चॅनेलवर या व्हिडीओला ३४ हजार लाईक तर ८५ हजार लोकांनी डिसलाईक केले आहे.त्यामुळे लाईक आणि डिसलाईक करणाऱ्यांच्या संख्येतील तफावत किती मोठी असल्याचे लक्षात येते.इतकेच नव्हे तर कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये जगातील खेळणी निर्मिती उद्योगाविषयी भाष्य केले. जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा नगण्य आहे.तो वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांनी एकत्र येऊन खेळण्यांची निर्मिती केली पाहिजे, असे मोदींनी म्हटले होते. तसेच लोकलसाठी व्होकल व्हा, असा नारा त्यांनी यावेळी पुन्हा दिला. मात्र मोदींची हीच बात जनतेला काहीशी पटलेली नाही. सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहेत. जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र मोदींनी या कशाचाही उल्लेख आपल्या मन की बात मधून केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधानांकडे आशेने पाहणाऱ्या अनेकांची नाराजी झाली.म्हणूनच त्यांच्या या व्हिडिओला डिसलाईक करत लोकांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.