हिवरखेड (प्रतिनिधी)- मागील काही महिन्यापासून चोरटयांनी हिवरखेड व आजूबाजूच्या परिसरात “धूम स्टाईल” चोऱ्यांचा सपाटाच लावला असून आता दिवसा ढवळ्या ग्रामस्थांच्या घरासमोरून अनेक मोटर सायकली, महागडे मोबाईल, शेती साहित्य, पेट्रोल इत्यादी चोरीचे जनु सत्रच सुरु केले असून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.
जून, जुलै मधे शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या शेतकऱ्यांनी शेती साठी लागणारे स्पिंकलर पाईप, नौजल, केबल, ड्रीप चे साहित्य असे सर्वच साहित्य शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नेले असता याच संधीचे सोने चोरट्यांनी करून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केबल, पाईप, नौजल लंपास केले आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली असता पक्की तक्रार नोंदविण्यासही हिवरखेड पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रामेश्वर शिंगणे, गजानन लोखंडे, संजय राऊत, डॉ राम तिडके, लक्ष्मण धांडे, समाधान शिंगणे, ब्रह्मदेव हागे, लक्षण फोपसे, मो. आसिफ यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील शेती साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. एवढेत नसून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाहून चोरट्यांचे प्रचंड मनोबल वाढले असून गेल्या काही दिवसातच चोरट्यांनी महागड्या मोबाईलसह प्रशांत ढोकणे, दीपक कवळकार, संदीप मगर, प्रवीण सपकाळ, मोहन झगडे यांच्या सह बऱ्याच ग्रामस्थांच्या मोटार सायकली लंपास केल्या काहींच्या मोटार सायकली तर अक्षशः त्यांच्या घरातून लांबवल्या मात्र पोलिसांच्या वेळकाढू धोरणामुळे या चोरीमधील काहींच्या तक्रारी सुद्धा घेण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आपल्या घरासमोरही मोटार सायकली ठेवतांना आता नागरिक भीत आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच चोरट्यांचे मनोबल वाढले असून दिवसाढवळ्या चोऱ्या करण्यासही चोरटे भीत नसल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी एका मोबाईल चोरट्याला नागरिकांनी स्वतः पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले सदर चोरट्यांनी इतर दोन साथीदार चोरट्यांची नावे सुद्धा पोलिसांना सांगितली. परंतु हिवरखेड पोलीस सदर चोरट्यांचा पीसीआर मिळविण्यात अपयशी ठरल्याचे बोलल्या जात आहे.
● सदर चोरटे हे एक दोन नसून त्यांची मोठी संघटित टोळी, आणि तरबेज रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एव्हढेच नव्हे तर बहुतांश चोरीच्या गाड्यांचा उलगडाच लागत नसल्याने सदर वाहने आणि इतर साहित्य चोरट्यांकडून बेभाव घेऊन त्याची विल्हेवाट लावणारे वेगळे खास तस्कर सुद्धा परिसरात सक्रिय असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. परंतु चोरीच्या दिवसाढवळ्या वाढणाऱ्या घटना आणि पक्क्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ पाहता हिवरखेड पोलीस चोरट्यांना गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून येत आहे.
●चोरट्यांनी अनेकांच्या शेतातील केबल व कॉपर तार इत्यादी साहित्य चोरी केल्यावर फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलिसांनी खूप दिवस टाळाटाळ करून अनेक दिवसाच्या पाठपुराव्यानंतर तक्रार दाखल केली मात्र आतापर्यंत अज्ञात चोरट्यांना पकडलेच नाही.
रामेश्वर शिंगणे, शेतकरी, हिवरखेड