अकोला,दि.२९- स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, या संदर्भातील सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून अकोला जिल्ह्याची कामगिरी सुधारावी,असे निर्देश राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज येथील आढावा बैठकीत दिले.
अकोला जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा आज ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, कृषि संचालक नारायण सिसोदे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, उपसंचालक अरुण वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा सादर करण्यात आला. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पिक कर्ज योजना, पिक विमा योजना, जिल्ह्यातील मुग व उडीद पिकावरील कर्ली रोगाचा प्रादुर्भाव तसेच पोकरा योजना यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात मुग पिकावर कर्ली रोगाचा प्रादुर्भाव याबाबत माहिती सादर करण्यात आली. हा विषाणू नवीन असल्याने त्याचे नमुने बंगळुरू येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यावरील प्रतिबंधात्मक किटकनाशकाच्या शिफारसीबाबत कृषि विद्यापीठांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे असे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पोकरा योजनेचा आढावा घेतांना ना. भुसे म्हणाले की, राज्यातील १५ जिल्ह्यात हा प्रकल्प सुरु आहे. त्यात अकोला जिल्ह्याची प्रगती कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विभागाच्या ग्राम ते जिल्हास्तरावरील यंत्रणांनी गती देऊन एका महिन्याच्या आत सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे, असे निर्देश त्यांनी दिले. या कामात कुणीही हेतुपुरस्कर दिरंगाई करीत असेल तर त्यावर कारवाई करा,असेही निर्देश त्यांनी दिले.पोकरा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात तालुकानिहाय आढावा घेतल्यानंतर ना. भुसे म्हणाले की, यासंदर्भातील कार्यान्वयन यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आहे. लवकरात लवकर प्रलंबित कामे मार्गी लावून योजनेची प्रगती दृष्टिपथास येऊ द्या.
ना. भुसे म्हणाले की, पीएम किसान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अकोला जिल्ह्यात महसूल विभाग व कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी संयुक्त मोहिम राबवावी. पिक कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. महात्मा जोतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही पिक कर्ज घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये. थकित कर्ज असले तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, असेही त्यांनी निर्देश दिले.
शेतकरी ते ग्राहक या साखळीस बळकटी
रानभाज्या महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून शेतीमालाचे उत्पादन ते थेट ग्राहक ही साखळी निर्माण होण्यास मदत झाली आहे. ही साखळी अधिक बळकट करुन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक दर कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्नाना चालना देण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणे यासारखे उपक्रम राबवावे. नुकतेच लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते, बियाणे पोहोच करण्याचा उपक्रमही कृषि विभागाने राबविला. त्यातून विकसित झालेली ही साखळी अधिक वृद्धिंगत करावी,असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघात विमा योजनेचा लाभ पोहोचवा
स्व. गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेतही प्रत्येक कृषि सहाय्यकाने आपापल्या कार्यक्षेत्रात जागरुकपणे शेतकरी अपघाताच्या घटनांची नोंद घेऊन त्यांना लाभ देण्याबाबत प्रस्ताव सादर करावे. तसेच या योजनेत सुधारणा करण्यात आल्या असून खातेधारक शेतकऱ्यासोबत त्यांच्या कुटूंबातील सदस्यालाही या योजनेत अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे.
गटशेतीला चालना देणार
गटशेतीला चालना देऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांचे शेतीमाल उत्पादन ते विक्री या साखळीतील सर्व सुविधांची निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यात गोडावून, कोल्ड स्टोअरेज सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत,असेही ना. भुसे यांनी सांगितले.
किटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण देणार
पिकांवर किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा होण्याच्या घटना रोखण्यासाठी किटकनाशक फवारणीचे कौशल्य देणारे दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना
महिलांना प्राधान्य देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका ही योजना राबविण्यात येत असून त्यातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
पिक स्पर्धांचे आयोजन करा
शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिक स्पर्धांचे आयोजन करावे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांचे प्रस्ताव यासाठी पाठवावे,असे निर्देशही ना. भुसे यांनी दिले.
दाळ उद्योगासाठी क्लस्टर योजना राबवा- पालकमंत्री ना. कडू
यावेळी पालकमंत्री ना. बच्चू कडू म्हणाले की, जिल्ह्यातील पिक नुकसान भरपाईची तसेच विम्याची काही प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबत मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन करुन प्रश्न मार्गी लावावा. जिल्ह्यात दाळ उद्योग मोठ्या प्रमाणावर असून या उद्योगाचे क्लस्टर निर्माण करुन त्यासाठी सुविधांचे पॅकेजही देण्यात यावे. पोकरा योजनेतील जिल्ह्यातील कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील कामगिरीची प्रगती लवकरच करुन दाखवू असेही ना. कडू यांनी आश्वस्त केले.
शेतकऱ्यांचा सन्मान व पुस्तिका विमोचन
याप्रसंगी रानभाज्या महोत्सवातील सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तृणधान्य माहिती पुस्तिकेचे विमोचनही ना. भुसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे आभार प्रदर्शन जिल्हा कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे यांनी केले.