नवी दिल्ली :
देशभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. मात्र, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरात आदी सहा राज्यांतील आतापर्यंत ८७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५७३ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.
एका वृत्तानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत राज्यातील ७.३ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २८ टक्के रुग्ण हे आऱोग्य कर्मचारी आहेत. तर एकूण मृत्यूपैकी त्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
२८ ऑगस्टपर्यंत कर्नाटक आणि तामिळनाडूतील प्रत्येकी १ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात कर्नाटकातील १२,२६० आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तामिळनाडूतील डॉक्टर्स, परिचारिका आणि आशा वर्कर्स मिळून ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाबाधित एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील ५५ टक्के रुग्णांचा समावेश आहे. या तिन्ही राज्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. महाराष्ट्रात २९२, कर्नाटकात ४६ आणि तामिळनाडूत ४९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढा देत असताना मृत्यू झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोनाने घेरले असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
रुग्णसंख्येचा उच्चांक कायम
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत नवे ७६ हजार ४७२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर १,०२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३४ लाखांवर पोहोचली आहे. यातील ७ लाख ५२ हजार ४२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत २६ लाख ४८ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील मृतांचा आकडा ६२ हजारांवर पोहोचला आहे.