अकोला – सर्व विभागाच्या योजनाच्या एकत्रीकरण करुन 15 सप्टेंबर पर्यंत ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनाचा आढावा घेताना, ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर,उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणीपुरवठा व स्वच्छता) राजीव फडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मरसाळे, तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी, दिपक बाजर, शिधणाधिकारी प्रकाश मुंकूद, सहा. वनसंरक्षक सुरेश बदोले, गटविकास अधिकारी गोपाल बोंडे, विनोद शिंदे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुनिल मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सासंद आदर्श ग्राम योजनेमध्ये अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केन्द्रीय शिक्षण, संचार, इलेक्ट्रानिकी व सूचना प्राद्योगिकी राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड करण्यात आली आहे. यात सन 2019-2020 साठी पातूर तालुक्यातील माळराजूरा, सन 2020-2021 साठी अकोट तालुक्यातील उमरा, सन 2021-2022 साठी बार्शिटाकळी तालुक्यातील सिंदखेड, सन 2022-2023 साठी बाळापूर तालुक्यातील निंबा गावाचा समावेश आहे.
निवड केलेल्या गावात जनजागृती व्हावी यासाठी गावाच्या सिमेवर सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवड झाली असल्याचा फलक दर्शनी भागात लावावे. तसेच गावातील ग्रामस्थाच्या संमतीने व तज्ञ लोकांच्या मदतीने ग्रामविकास आराखडा तयार करावा. 2019-2020 मध्ये निवड झालेल्या माळराजूरा या गावाचा ग्रामविकास आराखडा 5 सप्टेंबर पूर्वी तयार करावा. या गावासाठी प्रभारी अधिकारी म्हणून त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे. आदर्श गावात शिक्षण, आरोग्य तसेच इतर मुलभूत सोईसुविधा उपलबध होईल असा सर्वागीण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.