अकोला,दि.24- किटकनाकांच्या फवारणी करताना शेतकरी व शेतमजूर यांना विषबाधा होवून मृत्यू होण्याची शक्यता असते. सिजेन्टा इंडीया लि. व एफएमसी इंडीया प्रा. लि. या खाजगी कंपनीने प्रचाररथाव्दारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचाररथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेची सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंजाबराव वडाळ, कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, मोहिम अधिकारी मिलींद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक नितीन लोखंडे, सिजेंटा इंडीयाचे प्रतिनिधी समीर भोसले, एफएमसी इंडीयाचे प्रतिनिधी शत्रुघ्न उपरवट यांची उपस्थिती होती.
किटकनाशकाच्या फवारणी मुळे होणारी विषबाधा यासंबंधी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे दोन प्रचाररथाव्दारे आजपासून जनजागृती करण्यात येणार आहे. सिजेंटा इंडीया लिमिटेडचा रथ अकोला तालुक्यात तर एफएमसी इंडीया प्रा. लिमीटेडचा प्रचाररथ अकोट तालुक्यात फिरणार आहे. सदर रथाव्दारे दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.