काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबात अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पुनर्चनेची मागणी करण्यात आली आहे. तर काही नेत्यांनी गांधी घराण्यालाच पाठिंबा देत पक्षाचे नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहूल गांधी यांनी सांगितले तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू, असे सुचक विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
माध्यमांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व बदलाविषयी प्रश्न विचारले असता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. “या देशाचे नेतृत्व गांधी घराण्यानेच करावे. देश उभा करण्याची, पक्ष चालवण्याची त्यांच्याकडे सक्षमता आहे. त्यामुळे उद्या जर सोनिया गांधीनी निर्णय घेतला तर राहूल यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावे”, अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली. त्याचप्रमाणे “राहूल गांधी अध्यक्ष झाले आणि त्यांनी जर महाविकास आघाडी संदर्भात बाहेर पडायचा निर्णय घेतला तर, एक मिनिटही आम्ही थांबणार नाही. शेवटी सर्वोच्च नेत्यानी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्यच असला पाहिजे”, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा एक निष्ठावान नेता म्हणून मांडलेली ही भूमिका महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची ठरू शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पक्षाध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षाची धुरा पुन्हा राहूल गांधींनी स्विकारावी अशी काही काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. तर काँग्रेस मधील २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवत पक्ष पुनर्चनेबाबत मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार यावर दुमत होत असून पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे.