लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अवाढव्य वीजबिलाचा सर्व सामन्यांना चांगलाच शॉक बसला आहे. त्यामुळे वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.
लॉकडाऊन काळात आलेल्या वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार असून राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्तावही तयार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या प्रस्तावात युनिट वापरानुसार सरकार दिलासा देणार आहे. सरकारच्या तिजोरीवर हजार कोटींच्या आसपास यामुळे भार येणार आहे.
राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी 2019 साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे.
2019 साली जेवढा वीज वापर केला असेल तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात वीज बिल ग्राहकांना भरायचे आहे. त्यावरील वीज वापराचा भार राज्य सरकार उचलणार आहे. 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 70 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला 70 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 30 युनिटचे बिल राज्य सरकार भरणार आहे.
याच पद्धतीने जर वीज वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 50 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.तर वीज वापर 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.
अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले आहे अशा ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे.
राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू नसणार आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.