नवी दिल्ली : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंना यंदाचा भारतीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. रोहित शर्मा बरोबर आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅराऑलिंम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पान थांगावेलू यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रोहित शर्मा बरोबरच भारतीय क्रिकेट संघातील इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर नेमबाज अतनु दास आणि मनू भाकर यांचाही अर्जुन परस्कार मिळवणाऱ्या 27 जणांच्या यादीत समावेश आहे. रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली याच्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेट खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू आहे ज्याला 1998 मध्ये खेलरत्न पुरस्काराने नावाजण्यात आले होते. धोनीला 2007 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर हा पुरस्कार मिळाला होता. तर विराट कोहलीला 2018 ला वेटलिफ्टर मिराबाई चानूबरोबर खेल रत्न पुरस्कार मिळाला होता.
रोहित बरोबर खेलरत्न पुरस्कार मिळालेल्या विनेश फोगाट ही 2018 ला आशियाई स्पर्धेत महिला कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. तर स्टार टेबल टेनिसपटू मनेका बत्राने 2018 ला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर आशियाई स्पर्धेत रजत पदक पटकावले होते. 2016 च्या रिओ पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत मरियप्पनने उंच उडीत सुवर्ण पदक मिळवले होते. महिला हॉकपटू राणी रामपाल ही खेलरत्न पुरस्कार मिळवणारी तिसरी हॉकीपटू आहे. याचबरोबर खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी ती पहिली महिला हॉकीपटू आहे.