हिवरखेड (धीरज बजाज)-
बहुप्रतिक्षित अकोला– खंडवा- इंदौर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पैकी अकोट ते अकोला मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले. परंतु महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या अकोट- हिवरखेड- आमलाखुर्द या रेल्वे मार्गाचे काम रखडल्याने लाखो प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. हा मार्ग मेळघाट मधूनच न्यावा किंवा मेळघाटच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडून बुलढाणा जिल्ह्यातून न्यावा या मागणीला धरून दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याला आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे राजकीय स्वरूप आल्याचेही बोलल्या जात आहे. ह्या आत बाहेरच्या ओढातानीत सामान्य रेल्वे प्रवासी पुरते भरडले जात असून मागील साडे तीन वर्षांपासून मीटर गेज रेल्वे सुद्धा बंद झाल्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश रेल्वे संपर्क तुटलेला असल्याने प्रवाशांची स्थिती मात्र “तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले” अशी झाली आहे. प्रवाशांना हजारो रूपयांचा भुर्दंड पडत असून व्यापाऱ्यांचे लाखो करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत आत बाहेरचा निर्णय होत नाही. तोपर्यंत अकोट ते मध्यप्रदेश अशी मीटरगेज रेल्वे का सुरू ठेवली नाही? असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत. नवीन मार्गाचा निर्णय तात्काळ होत नसेल तर पूर्वी सुरू असलेली मीटर गेज रेल्वे अकोट ते मध्यप्रदेश पर्यंत पुन्हा सुरू करण्यात यावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
आपसी द्वंद आणि ओढताढ थांबवुन आतला किंवा बाहेरचा कोणताही मार्ग निवडा पण काम तात्काळ सुरु करून हा प्रकल्प पूर्ण करावा. अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा केल्यास ह्या मार्गावर तात्काळ तोडगा निघू शकतो असे मत हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी व्यक्त केले होते. अश्या आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रकाशित झाल्या होत्या. योगायोग म्हणजे त्याच्या काही दिवसातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना सोबतच प्रधानमंत्री मोदींसमोर अकोट- हिवरखेड- खंडवा हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मध्ये करताना मेळघाट एवजी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्यायी मार्गाने करण्यात यावे अशी विनंती केली. यावर पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना दिली आहे.
प्रतिक्रिया:-
अकोट- हिवरखेड- खंडवा रेल्वेमार्ग हिवरखेड पासून बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा, जळगाव जामोद मार्गे गेल्यास शेकडो गावे रेल्वे सोबत जोडली जाणार आहेत. त्यामुळे 2 लाख लोकांना फायदा होणार आहे.
प्रतापराव जाधव, खासदार बुलढाणा.