राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. लॉकडाउनमध्ये मूळगावी परतलेली मुले अद्यापही त्याच ठिकाणी अभ्यास करीत आहेत. दरम्यान, आता 13 सप्टेंबरला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असून, अडीच लाख विद्यार्थ्यांनी यापूर्वी निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर जाणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रे बदलण्याची मुभा आयोगाने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ठरलेल्या केंद्रावरच परीक्षा होईल, अशी ठाम भूमिका आयोगाने घेतली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने 24 मार्चपासून देशभर कडक संचारबंदी लागू केली. तत्पूर्वी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्टेल, अभ्यास केंद्रे बंद करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अंदाजित सव्वा लाखाहून अधिक परीक्षार्थी त्यांच्या मूळगावी परतले आहेत. उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, गडचिरोली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडले असून, ते परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहात होते. आयोगाने काही झाले तरी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या हेतूने निविदाही काढली आहे. तत्पूर्वी, परीक्षार्थींनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून आयोगाला परीक्षा केंद्रे बदलण्याची संधी द्यावी, असे पत्र पाठविले आहे. आमदार रोहित पवारही त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने आता सरकार काय तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे
आगामी परीक्षेची स्थिती
1) एकूण परीक्षार्थी : 2.60 लाख
2) परीक्षा केंद्रे : 800
3) एका खोलीतील विद्यार्थी : 24
4) मूळगावी परतलेले परीक्षार्थी : 1.30 लाख
मुख्यमंत्र्यांची आयोगाच्या अध्यक्षांसमवेत बैठक
राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मृतांची संख्याही कमी झालेली नाही. राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय प्रलंबितच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने दोनवेळा पुढे ढकललेली राज्यसेवेची परीक्षा आता 13 सप्टेंबरला घेण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, त्याच दिवशी “आयबीपीएस’चीही परीक्षा जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हिताचा तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांची 15 ऑगस्टला भेट घेणार असल्याचे समजते. बैठकीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करतील, याची परीक्षार्थींना उत्सुकता आहे.