अयोध्या
अयोध्येत आज श्री राम मंदिराचा भूमीपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. त्यानंतर भूमीपूजनस्थळी संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी, सियावर राम चंद्र की जय, असा रामनामाचा जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. संपूर्ण देश आज रोमांचित, दीपमय, भावूक झाला आहे. करोडो लोकांना विश्वास होत नाही की हा पवित्र दिवस बघायला मिळाला. शेकडो वर्षांपासून संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेली रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.
श्रीराम मंदिर आमच्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. आमच्या शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे आणि कोट्यवधी लोकांच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीराम आमच्या मनात वसले आहेत. ज्यांच्या बलिदानातून, त्यागातून आणि संघर्षातून आज हे स्वप्न साकार झाले आहे त्या सर्व १३० कोटी देशवासीयांना मी नमन करतो, असेही मोदी म्हणाले.
आज भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरुन लखनौला रवाना झाले. त्यांनतर ते हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अयोध्येत दाखल झाले. प्रथेप्रमाणे त्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यापूर्वी 10 व्या शतकातील हनुमान गढी येथे बजरंबली हुनमानांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सव्वा अकराच्या सुमारास राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन स्थळी पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी या परिसरात धार्मिक महत्व असलेल्या पारिजातकाचे रोपटे लावले. त्यानंतर त्यांनी भूमिपूजन स्थळी असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. ते दर्शन घेत असताना परिसर शंखनादाने दुमदुमला.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या विधींना सुरुवात केली. यावेळी पुजारी आणि पंतप्रधानांनी शारिरीक अंतर नियमांचे काटेकोर पालन केले होते. विधीस्थळी पंतप्रधानांबरोबर राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. साधारण अर्धा तास विधीवत पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या माथी रामजन्मभूमीचा टिळा लावला. याचबरोबर भूमिपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात आणि श्रीराम जय राम जय जय राम च्या जयघोषात संपन्न झाला.