मुंबई : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एसटीचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाला कर्मचाऱ्यांना पगार देणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ५५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबतची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विट करत दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
एसटीत १ लाख ५ हजार कर्मचारी आणि अधिकारी आहेत. लॉकडाऊनमध्ये एसटीच्या चालक-वाहकांनी लाखो परप्रातीयांना राज्याच्या सीमेपर्यंत, तर काहींना त्यांच्या राज्यापर्यंत नेऊन सोडले. शिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली. जून महिन्यात राज्य शासनाने सवलतीचे २७० कोटी महामंडळाला दिले. त्यातून कर्मचार्यांना मे महिन्याचा ५० टक्के पगार देण्यात आला. आता पुन्हा सरकारने महामंडळाला ५५० कोटी रुपये दिले आहेत.