नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी व्यवहारांना यामध्ये मुभा देण्यात आली आहे. अनलॉक ३, येत्या १ ऑगस्टपासून अमलात येणार असून टप्याटप्याने व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे.राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून आलेला प्रतिसाद आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी व्यापक चर्चा केल्यानंतर त्यावर ही नवी मार्गदर्शक तत्वे आधारित आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ठ्ये:-
- व्यक्तींच्या रात्रीच्या ये- जा करण्यावरचा निर्बंध (नाईट कर्फ्यु) रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली.
- योग संस्था आणि जिम्नॅशियम ५ ऑगस्टपासून उघडण्यासाठी परवानगी. या संदर्भात, शारीरिक अंतर राखण्यासाठी आणि कोविड -१९ चा संसर्ग रोखण्यासाठी,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मानक संचालन पद्धती जारी करेल.
- स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर यासह इतर आरोग्य नियमांचे पालन करत परवानगी.या संदर्भात गृह मंत्रालयाने २१-७- २०२० रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन आवश्यक.
- राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर, शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- प्रवाश्यांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला वंदे भारत अभियानांतर्गत मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर, खालील बाबी वगळता सर्व बाबींना परवानगी देण्यात आली आहे-
- मेट्रो रेल्वे,सिनेमा हॉल, तरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियाम, सभागृह आणि तत्सम स्थळे
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आणणारे कार्यक्रम,परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार या बाबी खुल्या होण्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे ठरवण्यात येतील.
प्रतिबंधित क्षेत्रात ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी जारी राहील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन, कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राचे काळजीपूर्वक सीमांकन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक परिघिय नियंत्रण राखणे आवश्यक असून केवळ आवश्यक बाबीनाच परवानगी राहील.ही प्रतिबंधित क्षेत्रे संबंधित जिल्हाधिकारी आणि राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांच्या संकेतस्थळावर अधिसूचित केली जातील आणि ही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायलाही दिली जाईल.प्रतिबंधित क्षेत्रातल्या व्यवहारांवर राज्ये आणि केंद्र शासित औथोरिटी कडून काटेकोर देखरेख ठेवली जाईल. प्रतिबंधात्मक उपायांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल.प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या बाबींसाठी राज्ये निर्णय घेणार
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थितीच्या मूल्यांकनानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काही बाबींचा प्रतिबंध करू शकतात, किंवा आवश्यक काही निर्बंध घालू शकतात. मात्र आंतर राज्य आणि राज्या अंतर्गत व्यक्ती आणि मालाची आवक जावक याना निर्बंध नाही. अशी ये-जा करण्यासाठी वेगळ्या परवानगीची, संमतीची,ई परवानगीची आवश्यकता नाही.
कोविड-१९ व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देश
शारीरिक अंतराची खातरजमा करून कोविड-१९ व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे पालन देशभरात सुरूच ठेवायचे आहे. दुकानांनी, ग्राहकांमध्ये पुरेसे शारीरिक अंतर राखण्याची आवश्यकता आहे. गृह मंत्रालय राष्ट्रीय निर्देशाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल.
असुरक्षित व्यक्तींचे संरक्षण
असुरक्षित व्यक्तीं उदा. ६५ वर्षावरील व्यक्ती, इतर आजार असलेल्या व्यक्ती,गरोदर महिला,१० वर्षाखालील मुले, यांना अत्यावश्यक गरजा आणि आरोग्य विषयक बाबी वगळता घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.