अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि शेख साबीर या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे या तिघांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी कारागृहात असताना त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तीनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रवीण गावंडे आणि मोहम्मद साबिर या दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.