हिवरखेड (प्रतिनिधी)- Covid-19 या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमांच्या द्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न शासन व शैक्षणिक संस्था करत आहेत.ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात येणारे अडथळे दुर करणे शक्य नसल्यामुळे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील शिक्षकांनी मोहल्ला शाळा या पर्यायाचा प्रयोग सुरू केला आहे.गावातील एका मोहल्ल्यातील पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट सोशल डिस्टन्स चे पालन व इतर आरोग्य विषयक निर्देश लक्षात घेऊन एकत्रित करत मोहल्ला शाळा उपक्रम सुरू केला आहे.आठवड्यातील दोन दिवस शाळेतील गोपाल मोहे, निखील गिऱ्हे व तुलसीदास खिरोडकार हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.यासोबतच मुख्याध्यापक सौ शीला टेंभरे यांच्या मार्गदर्शनात अध्यापक ओमप्रकाश निमकर्डे, श्रीकृष्ण वाकोडे राजेंद्र दिवनाले,सौ सुरेखा हागे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिनकर धूळ ,संदीप काटे ,युवराज खंडेराव यांनी गावातील दर्शनी भागातील रस्त्याच्या भिंती वर विविध विषयांचे पाठ्य घटक लेखन करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले आहेत.मोहल्ला शाळा या उपक्रमातून प्रत्यक्ष शिक्षक सहवास व शैक्षणिक समस्यांचे निराकरण होत असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात व सहभाग घेण्यात आनंद वाटत आहे. आठवड्यातुन दोन दिवस हा ऊपक्रम राबन्यात येतो.