अकोला,दि.26- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा केले जात आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर लागू असलेल्या लॉकडाऊन नियमावलीमुळे जिल्ह्यातील csc सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुले असतात. तथापि शेतकऱ्यांना खरिप 2020 च्या पिक विमा योजनेचे अर्ज व हप्ते भरणे सोईचे व्हावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी येत्या शुक्रवार दि.31 जुलै 2020 पर्यंत ही सर्व केंद्र 24 तास खुले ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभुमिवर सर्व सेवा केंद्र यांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सन 2020-21 मध्ये खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी जिल्हयातील csc सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र दि. 31 जुलै 2020 या अंतिम मुदतीपर्यंत 24 तास खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व csc सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, व महा-ई-सेवा केंद्र यांनी आपली केंद्र 24 तास खुले ठेवावे व शेतकऱ्यांना सेवा द्यावी. तसेच या कालावधीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.