जळगाव जामोद : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पामधील जलाशयाच्या पातळीमध्ये यावर्षी अद्याप फारशी वाढ झाली नाही. सध्यास्थितीत अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात ५३.७१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकुण मोठे आणि मध्यम २५ प्रकल्प आहेत. तर ४७७ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील उर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पुस प्रकल्प, अरूणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपुर्णा अशा ९ प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी पावसाळा सुरू होवून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र कमी पावसाळ्यामुळे अद्याप एकही प्रकल्प १०० टक्के भरला नाही. तर या ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ६३.११ टक्के एवढा जलसाठ्याची नोंद आहे. वाशिम जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. त्याचप्रमाणे या पाचही जिल्ह्यामध्ये एकुण २५ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती ५, यवतमाळ ७, अकोला ४, बुलडाणा ७, आणि वाशिम २ अशा मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या प्रकल्पांवर हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग केला जाते. मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या प्रकल्पांमध्ये उन्हाळ्यातही पाण्याची पातळी टिकून होती. परंतु यावर्षी हे प्रकल्प १०० टक़्के भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. तसेच अनेक प्रकल्पांमधून पिण्याच्या पाण्याचा वापर केल्या जातो आधी प्रकल्पे १०० टक्के भरण्याची गरज आहे. त्यामध्ये अमरावती विभागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.