अकोला : कृषी विभागाने वारंवार जनजागृती करूनही काही शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड केल्याची माहिती खुद्द कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. त्यामुळेच काही भागामध्ये कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कृषी विभाग संबंधित शेतकऱ्यांसह विक्रेते आणि बियाणे कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत आहेत.
बोंडअळींसह इतर कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षभर जनजागृती मोहीम राबविल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले; परंतु तरीदेखील अकोल्यासह जवळपासच्या भागात अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली.
स्थानिक स्तरावर बियाणे मिळत नसल्याने काही शेतकºयांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची लागवड केल्याने बोंडअळीचे जीवनचक्र कायम असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करूनही काही शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, अशा सर्व शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत कृषी विभाग असल्याची माहिती आहे. गत चार ते पाच वर्षांपासून राज्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
कृषी विभागाने गावोगावी शेतीशाळा घेऊन शेतकºयांची जनजागृती केली. त्यानंतरही जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. कृषी विभागाच्या या मोहिमेला यश आल्याचे दिसत नाही. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करणाºया शेतकºयांना बोंडअळी प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.
गत वर्षभरापासून कृषी विभागातर्फे विविध माध्यमातून शेतकºयांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी करु नका, असे आवाहनदेखील करण्यात आले होते; मात्र तरीदेखील शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. त्यामुळे बियाणे विक्रेते, कंपन्यांसह शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– मोहन वाघ,
कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, अकोला