नवी दिल्ली : उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ;जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना उदयनराजेंनी शपथविधीवेळी केलेल्या घोषणेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने याआधी भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता तर मी राजीनामा तिथल्या तिथे दिला असता. मी गप्प बसणाऱ्यातला नाही. कालच्या घटनेला राजकीय अंग देऊ नये. तसं काही झालं नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
या विषयावर चर्चा न करता कृपा करून जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करू नका. चुकीचं काही वाटलं असतं तर मी स्वतः माफी मागावी अशी मागणी केली असती. मला जाब विचारण्यापेक्षा शरद पवारांना विचारा. शपथविधीवेळी शरद पवार तेथे उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांनी चुकीचे काही म्हटलं नाही. मी केलेली घोषणा राज्यघटनेला धरून नाही. असा त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यानंतर वाद-विवाद झाले. मात्र, वाद निर्माण करण्यासाठी तसं काही झालं नाही, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
हात जोडून कळकळीचे विनंती आहे की याला राजकीय अंग देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.