अकोला,दि.२१-शासनाने बकरी ईद हा सण कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात घरच्या घरी व साधेपणाने साजरा करावा,असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. याबाबत शासनाच्या गृहविभागाने दि.१७ जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे निर्देशीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन संबंधित यंत्रणांनी उपाययोजना व कार्यवाही करावी,असे निर्देश संबंधित यंत्रणाप्रमुखांना दिले आहेत.
बकरी ईद हा सण शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. त्यापार्श्वभुमिवर सर्व संबंधित यंत्रणांची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिप्रसाद मिश्रा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, मनपा उपायुक्त पुनम कळंबे, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय डॉ, नम्रता बाभुळकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. कोमल काळे, डॉ. वैभव पटेल, डॉ. आर. बी सोनोने, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सोळंके, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पी.एम. मेसारे, परिवहन अधिकारी समीर ढेमरे व दत्रात्रय कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बकरी ईदच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नियोजन सादर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा १९९५, प्राणी वाहतुक अधिनियम १९७८ या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत निर्देश देण्यात आले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्या गृह विभागाने दि.१७ जुलै रोजी बकरी ईद सण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज ही मस्जिद वा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी घरीच अदा करावी. तसेच या पार्श्वभुमिवर जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी ते ऑनलाईन पद्धतीने वा दूरध्वनीवरुन करावी, शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, या कालावधीत प्रतिबंधात्मक क्षेत्र (Containment Zone) मध्ये लागू असलेले निर्बंध कायम राहतील व त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. बकरी ईद निमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, एकत्र जमू नये. या संदर्भात शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी निर्गमित केलेल्या सुचना व नियमांचे पालन करावे,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माहिती देण्यात आली की, बकरी ईदनिमित्त जिल्ह्यात २८ वाहतुक तपासणी नाके असून त्यासर्व ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या तीन दिवसांसाठी करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एक संनियंत्रण अधिकारी व पर्यवेक्षक अधिकारीही नेमण्यात आला आहे. या शिवाय पोलीस दल व परिवहन विभागाचे अधिकारीही या पथकात सहभागी असतील.
नियुक्त संनियंत्रण अधिकारी याप्रमाणे- अकोला- डॉ. नम्रता बाभुळकर- ९४२२१२०४५३, अकोट- डॉ. प्रसाद खोडवे- ७०२०६१४१७१, बाळापूर- डॉ. अरुण यादगिरे-९५२७२९७०६६, बार्शी टाकळी-डॉ. स्नेहल पाटील- ७७३८५५५१३८, मुर्तिजापूर- डॉ. आर.डी. जावरकर- ९४०५७२४७५५, पातूर- डॉ. ए.ए. झाडे- ८९९९९०३८१९, तेल्हारा- डॉ. पी.एन. राठोड-९४२३७५६९६७.
पर्यवेक्षक अधिकारी याप्रमाणे- अकोला- डॉ. आर.बी.सोनोने- ८२७५९४३५८४, अकोट- डॉ. आर.बी. निचळ- ९८०५०८८३५८, बाळापूर- डॉ. एच. जे. धुळे- ९८५०४१८४४०, बार्शीटाकळी- डॉ. आर.आर. गोळे- ९५२७९०८५६८, मुर्तिजापूर- डॉ. दीपक कऱ्हे-९९६००२८४५१, पातूर- डॉ. दिलीप बिलेवार- ९८२२८४५३७७, तेल्हारा-डॉ. रघुनाथ इंगळे- ९८२२७२८४४२.
याशिवाय परिवहन विभागाचे समीर ढेमरे-७५८८०६००५६ व दत्तात्रय कदम-९१५८०५०४०० हे यात सहभागी असतील, अशी माहिती देण्यात आली.