अकोला : नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या परिचारिकांना एका व्यक्तीने शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना सोमवारी शिवसेना वसाहतमध्ये घडली. याप्रकरणी परिचारिकांच्यावतीने जुने शहर पोलीस ठाण्यात संबंधित इसमा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना वसाहतमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भातील माहिती मनपा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने या भागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह सर्वेक्षणाला प्रारंभ केला. यावेळी शिवसेना वसाहतमध्ये गेलेल्या मनपा परिचारिकांना कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबीयांनी अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिल्याचा प्रकार घडला. संबंधित परिचारिकांनी या घटनेची माहिती पश्चिम झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांना दिल्यानंतर टापरे यांच्या निर्देशानुसार सदर महिला परिचारिकेने जुने शहर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये संबंधित इसमाविरोधात पोलीस तक्रार दिली.
इसम घरात दडून बसला!
महापालिकेच्या परिचारिकांना शिवीगाळ करून धमकी देणारा इसम महापालिकेचे पथक पोहोचताच घरात दडून बसला होता. मनपा कर्मचाऱ्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर हा इसम घराबाहेर निघत नसल्याचे पाहून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी दिला दंडुक्याचा प्रसाद!
मनपाच्या महिला परिचारिकांना शिवीगाळ करणाºया इसमाची चित्रफीत शहरात व्हायरल होताच सर्वसामान्यांमध्ये संताप व चीड निर्माण झाली. ही चित्रफीत जुने शहर पोलिसांनी पाहिल्यानंतर संबंधित इसमाला चांगलाच पाहुणचार देण्यात आला. त्यावेळी हा इसम पोलिसांना हातपाय जोडून गयावया करीत असल्याची चर्चा पोलीस ठाण्यात रंगली होती.