अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनापेठ परिसरात अमरावती येथून ट्रकमध्ये कोंबून आणलेल्या तसेच कत्तलीसाठी ठेवलेल्या १० गुरांना पोलिसांनी जीवदान दिले. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली असून, या ठिकाणावरून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
शहरातील ताजनापेठ परिसरात गुरांची कत्तल करण्यात येणार असून, ही १० पेक्षा अधिक गुरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने सदर ठिकाणावर छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका केली. त्यानंतर ही गुरे गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आली आहेत. अमरावती येथून अकोला शहरात ही गुरे कत्तलीकरिता आणली जात असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर अनेक तस्करांकडून मोठ्या प्रमाणात गुरांची वाहतूक सुरू असतानाही त्याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे; मात्र कारवाई करतानाही आरोपी फरार होत असल्याने या कारवाईमध्ये पोलिसांनी आणखी दक्षता बाळगण्याची गरज असल्याची मागणी गोरक्षकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.