अकोला : राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत; परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सदर साहित्य खरेदीच्या बाबतीत प्रस्ताव तयार करण्याच्या मुद्यावरून आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या अनुषंगाने इयत्ता नववी, दहावी ते अकरावीपर्यंतच्या शाळा १ जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना होत्या; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यादरम्यान, राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्राथमिक स्तरावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये हालचाली सुरू झाल्या; परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे आॅनलाइन प्रणालीचा वापर करून किंवा शिक्षकांना थेट त्यांच्या वस्तीमध्ये पाठवून शिकवणुकीचे पर्याय वापरल्या जात आहेत. अशा स्थितीमध्ये शाळांमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे त्यांच्यासाठी साहित्याची खरेदी कशी करायची, त्याचे प्रस्ताव कसे तयार करायचे, या मुद्यावरून राज्यभरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.