अकोला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी गुगल क्लासरूम मोफत उपलब्ध करून दिली आहे. गुगल क्लासरूमसाठी शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख १८ हजार ४४४ शिक्षकांनी नोंदणी केली आहे.
गुगल क्लासरूम अंतर्गत प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्यास शाळेसाठी आयडी तयार करून देण्यात येणार आहे. याद्वारे शिक्षक एकावेळी २५0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन तासिका घेऊ शकतील. तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांना अनलिमिटेड स्टोरेजचे जी सुट आयडी व विद्यार्थ्यांसाठी कमाल मर्यादा असणारे जी सुट आयडी व पासवर्ड देण्यात येतील. ज्याचा वापर करून गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण आॅनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ४0 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणासंबंधीच्या सूचना, एसएमएसद्वारे गुगल क्लासरूमचा आयडी, पासवर्ड व प्रशिक्षणाचा तपशिल कळविला जाणार आहे.
अमरावती विभागात शिक्षकांची नोंदणी
अकोला- ३१४१
अमरावती- २६६३
यवतमाळ- २१0३
वाशिम- १0२४
बुलडाणा- ४५२३
…………………….
एकूण- १३४५४