अकोला : अकोल्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता शुक्रवार संध्याकाळपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट असला तरी संध्याकाळ होताच अनेक नागरिक इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर निघत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर अनावश्यक कामांसाठी कोणीही बाहेर पडले नसल्याचे पोलीस कारवाईवरून स्पष्ट होते. रस्तेही निर्मनुष्य असतात. अत्यावश्यक सेवतील कर्मचारी व पोलिसांचीच तेवढी वर्दळ दिसून येते. त्यामुळे शनिवारी अकोलेकरांनी लॉकडाऊन गांभीर्याने पाळल्याचे दिसून आले; मात्र रविवारी संध्याकाळी वर्दळ काही प्रमाणात वाढल्याचे दिसले. संध्याकाळी तर मुख्य रस्त्यांना जोडणार अनेक गल्लीबोळात नागरिकांची फिरण्यासाठी गर्दी होतांना आढळली.
शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे मुख्य रस्ता टाळून गल्ल्यांमधून रपेट मारण्याचा मध्यम मार्ग अनेकांनी स्विकारल्याचे दिसून आले.