नागपूर- शिक्षण क्षेत्रामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा या विषयात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या हट्टापायी खेळ खंडोबा चालू आहे व यामध्ये विद्यार्थी भरडताना दिसत आहे. अशातच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे गुणांकन पत्रिका भरून देते वेळी त्यावर स्पष्टपणे प्रमोटेड कोविड-१९ चा स्पष्ट उल्लेख केलेला आढळून येत आहे. हि बाब विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणारी आहे. कृषी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये या प्रकारचा स्पष्टपणे उल्लेख करणे म्हणजे सरकार द्वारा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ –खंडोबा मांडल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकार द्वारा सर्वाना कोरोना परिस्थितीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयावर कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता ह्याचे परिणाम न बघता विद्यार्थ्यांना प्रमोटेड करण्याची भूमिका घेतली आहे परंतु त्याचे आगामी परिणाम काय होईल याचा तीळमात्रही विचार होताना दिसून येत नाही.
अभाविप सुरुवातीपासून आपले मत मांडत आली आहे कि कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विचार करावा कारण मुल्यांकन हे विद्यार्थ्यांच्या भाविष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तसेच यूजीसी ने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे मुल्यांकन महाविद्यालयांनी करावे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का बसणार नाही, असे मत विदर्भ प्रांत मंत्री रवि दांडगे यांनी व्यक्त केले आहे.