उज्जैन :
उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक केली आहे. त्याला उज्जैनमधील महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान विकास दुबेच्या दोन सहकाऱ्यांचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले.
कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या कानपूर पोलिसांवर दुबेच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत ८ पोलिस शहीद झाले. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. पोलिसांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला होता. हिस्ट्री सीटर विकास दुबेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशाला विकास दुबेने हादरवून सोडले होते.
विकास दुबेला पकडण्यासाठी उत्तर पोलिसांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याला आणि त्याच्या टोळीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची ४० पथके २४ तास शोध घेत होती. या दरम्यान त्याला उज्जैनमध्ये अटक करण्यात आली.
विकास दुबेचे घर बिकारू गावात आहे, तेथून त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, विकास दुबे याच्या जवळच्या तीन सहकाऱ्यांना आतापर्यंत पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. अमर दुबे, बउवा दुबे आणि प्रभात मिश्रा अशी त्यांची नावे आहेत.
प्रभात मिश्राला फरीदाबाद येथील हॉटेल्समधून अटक केली होती. प्रभातने पोलिस कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पायावर पोलिसांनी गोळी मारली होती. गंभीर जखमी झालेल्या या आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे.
हिस्ट्री सीटर असलेल्या विकास दुबे याने २००१ मध्ये राजनाथ सिंह यांच्या सरकारच्या काळात मंत्रीपदाचा दर्जा मिळालेल्या संतोष शुक्ला यांची ठाण्यात घुसून हत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले होते. त्याच्याविरोधात ६० गुन्ह्यांची प्रकरणी नोंद आहेत. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.