अमरावती : लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला पहिला अर्ज ते राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल येण्यापर्यंत सर्व माहिती भरण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि ई-मेलही याच सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकरणांची निवड करून वेळी सर्व संबंधितांना एकाचवेळी नोटीस बजावणे शक्य होणार आहे. यात डाक, कागद, मनुष्यबळ यांचा कमीत कमी उपयोग होईल, त्याचबरोबर या सर्व कामासाठी लागणारा वेळी वाचणार आहे.
सध्यास्थितीत राज्य माहिती आयुक्त कार्यालयात नऊ हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एका दिवशी एक जिल्हा याप्रमाणे दररोज किमान 70 सुनावण्या घेऊन येत्या नऊ-दहा महिन्यात ही प्रकरणे निकाली निघतली. सुनावणीनंतर दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात नवीन येणारे प्रकरणेही सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. या सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी अर्जदारांनी आपला सुरवातीपासून ते राज्य माहिती आयुक्त कार्यालयापर्यंतचे सर्व अर्ज संगणकीकृत करणे गरजेचे आहे. तसेच अर्जावर भ्रमणध्वनी आणि ई-मेल आयडी लिहिणे आवश्यक आहे.
‘टेलिग्राम’वरून माहिती
जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना माहिती अधिकाराबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती आयुक्तांना संपर्क साधावा, तसेच उपयुक्त माहिती ‘टेलिग्राम’ ॲपवरून देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना https://t.me/joinchat/NIqTuBfeaP6ZRhpecjssTg या लिंकवरून ग्रुपमध्ये सामिल होता येईल.
सध्या दररोज २५ प्रकरणांची गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात येत आहे. मागील शुक्रवारी नागपूर येथील २५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. अमरावती विभागातील एका दिवशी एका जिल्ह्याची ७० प्रकरणे हाताळली जातील. यासाठी नवे सॉफ्टवेअर सुरू केले आहे. सुनावणी गतीने होण्यासोबतच कार्यालय पेपरलेस होणार आहे.
– संभाजी सरकुंडे, राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ अमरावती. |