कुर्ला (मुंबई) : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे वयाच्या 71 व्या वर्षी आज (शुक्रवार) निधन झाले. 20 जून रोजी श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्यांना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांची प्रकृती सुधारली देखील होती. त्यांची कोरोना टेस्ट ही करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती.
शुक्रवारी रात्री त्यांना पुन्हा अत्यावस्थ वाटू लागले आणि रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मालाड येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांच्यावर सुपुर्दे खाक करण्यात आले. सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्री देवी, काजोल, जुही चावला अशा प्रसिद्ध अभिनेत्रींचे नृत्य दिगदर्शन केले होते. 2000 पेक्षा जास्त गाण्यांना त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. यात एक, दोन, तीन सारखे गाणे, हमको आज कल है, हवा हवाई सारख्या प्रसिद्ध गाण्याचा समावेश आहे. सरोज खान यांना तीन अपत्य आहेत. ज्यात एक मुलीचा मृत्यू झाला असून एक मुलगी आणि एक मुलगा कब्रस्तानमध्ये आले होते. तसेच कुटुंबीय आणि काही जवळच्याच व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.