अकोला,दि.२)- कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पातूर येथील नागरिकांणी रविवार दि.५ रोजी पातूर येथे तयार केलेल्या स्वॅब कलेक्शन सेंटर मध्ये आपल्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी देण्या करीत स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पातूर शहरातील खाजगी डॉक्टर व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते.
पातुरच्या तहसिलदार कचेरीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बाळापुर उपविभागीय अधिकारी रमेश पवार, बाळापुर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी विनोद शिंदे, मुख्याधिकारी सोनाली यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी जी बायसठाकूर, शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे, डॉ. डाखोरे, वर्षा संजय बगाडे तसेच या बैठकीस शहरातील ४० डॉक्टर उपस्थित होते.
रविवार दि.५ रोजी पातुर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक २ मध्ये आणि मौलाना आझाद सभागृहांमध्ये सकाळी दहा वाजेपासून संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, ज्यांना ही सर्दी ताप खोकला आणि मधुमेह दुर्धर आजार हृदयरोग आणि जेष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्या सर्वांनी येथे येऊन आपल्या घशाचे नमुने द्यावे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. पातूर शहरात सध्या कोरोनाचे १८ रुग्ण आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पातूर शहरांमध्ये पुढील कालावधीत या आजाराचे रुग्ण वाढण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. या मोहिमेचा उद्देश प्रामुख्याने कोरोनाचा फैलाव रोखणे असून त्यासाठी घशातील स्त्रावाचे नमुने संकलन या मोहिमेत केले जाणार आहे. त्यामुळे शिरला पातूरच्या नागरिकांनी पुढे येऊन या मोहिमेत सहभागी व्हावे. त्याबरोबरच नगरसेवक, लोकप्रतिनिधी तथा खाजगी डॉक्टर यांनीही हिरीरीने सहभागी होऊन नागरिकांना प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगरपरिषदेतही बैठक
त्यानंतर पातुर नगर परिषदेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पातूर नगर परिषदेच्या अध्यक्ष प्रभाताई भिमराव कोथळकर, उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद इकबाल, सय्यद बुर्हानभाई, ईद्दूभाई, मुख्याधिकारी सोनाली यादव, बाळापुर उपविभागीय अधिकारी रमेश पवार बाळापुर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके तहसीलदार दीपक बाजड गटविकास अधिकारी विनोद शिंदे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय रामसिंग जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक जी जी बायसठाकूर शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिराग रेवाळे डॉक्टर डाखोरे, वर्षा संजय बगाडे रूपाली सचिन सुरवाडे यांच्यासह शहरातील मौलवी उपस्थित होते. तेथेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी उपस्थितांना स्वॅब संकलन मोहिमेस नागरिकांना प्रतिसाद देण्याबाबत सहयोग द्यावा असे आवाहन केले.
कोविड केअर सेंटरला भेट व रुग्णांची विचारपूस
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पातूर कोविड केअर सेंटरला जाऊन क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना भेट दिली. तेथे त्यांच्या भोजन निवास व्यवस्थेबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवण्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.