अमरावती : लॉकडाऊन विनंती अर्ज या नावाखाली 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळण्याची खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन नागरिकांकडून अर्ज भरून घेऊन पैसे उकळण्याचे प्रकार समाजकंटकांकडून घडत आहेत. तशा तक्रारीही प्राप्त होत असून, अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने दहा हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळण्याची दिशाभूल करणारी माहिती काही समाजकंटकांकडून प्रसारित केली जात आहे.त्यासाठी अर्ज भरून ग्राहकांकडून पैसेही उकळले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या फसवणूकीच्या प्रकाराचा पोलीसांनी तत्काळ छडा लावून संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशी कुठलीही योजना अस्तित्वात नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. त्याचप्रमाणे, कुठेही असा प्रकार निदर्शनास आल्यावर तत्काळ त्याची माहिती पोलीसांना, तसेच प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.