नवी दिल्ली: केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास , पंतप्रधान कार्यालय, कार्मिक , सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले की, भारताच्या “गगनयान” या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणावर कोविड महामारीचा परिणाम होणार नाही आणि याची तयारी योग्य दिशेने सुरू आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि अंतराळ विभागाची गेल्या एक वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यासाठी आखण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या मोहिमांबद्दल माहिती देताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की कोविड -19 महामारीमुळे रशियामध्ये चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण थांबवावे लागले, मात्र इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक चमूचे मत असे आहे की प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रक्षेपणाची तारीख यात थोडे अधिक अंतर यापूर्वीच ठेवण्यात आले आहे. अंतराळवीरांचे प्रशिक्षण आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.आणि 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनापूर्वी नियोजित वेळापत्रकानुसार हे प्रक्षेपण होणार असल्याचे ते म्हणाले.
इस्रोच्या उपक्रमांमध्ये खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, “भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र (आयएन-स्पेस)” नावाची नियामक संस्था स्थापन केली जाईल. यामुळे खाजगी कंपन्याना समान संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सहभाग प्रोत्साहित करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आपल्या अंतराळ मोहिमेची क्षमता आणि संसाधने वाढविण्याबरोबरच खासगी कंपन्यांचा वाढता सहभाग यामुळे प्रतिभावान अंतराळ वैज्ञानिक आणि तज्ञ जे नवीन संधींच्या शोधात भारताबाहेर जात होते ते बाहेर जाण्यापासून परावृत्त होतील.
चांद्रयान-3 अभियानाबद्दल डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सध्यातरी याचे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेमध्ये मॉड्यूल घेऊन जाण्यासाठी एक लँडर, रोव्हर आणि प्रॉपल्शन सिस्टमचा समावेश असेल मात्र यात ऑर्बिटर असणार नाही कारण याआधीचा ऑर्बिटर पूर्णपणे कार्यरत आहे, असे ते म्हणाले.