अकोला,दि.२७- महापालिका हद्दीत अनेक लोक स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी लोकांना मार्गदर्शन करुन प्रेरीत करा, असे आवाहन आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मौलवींना केले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात मौलवी व उर्दू शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांची संयुक्त बैठक बोलावली होती. नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीस मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपायुक्त वैभव आवारे, सहाय्यक आयुक्त पूनम कळंबे, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना, वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, डॉ. अस्मिता पाठक तसेच हाफिज बेग,मौलाना गुलाम मुस्तफा, मौलाना मोहमद आतिक, मौलाना शहाजान जमिल, मुफ्ती गुफारन गाजि, हफिउल्ला बेग मौलवी तसेच अन्य उपस्थित होते.
मनपा आयुक्त कापडणीस यांनी सांगितले की, आरोग्य तपासण्या ज्या ज्या भागात होत आहेत तेथे लोकांनी स्वतःहून पुढे यावे. तसेच जे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व अन्य व्याधी असणाऱ्या लोकांच्या प्राधान्याने तपासण्या करण्यात येत आहेत. त्यासाठी लोकांनी आपले आजार लपवल्याने समस्येत वाढ होत आहे. त्यामुळे यासंदर्भात मौलवी, स्थानिक समाजसेवक, शिक्षक या सारख्या व्यक्तिंनी जर लोकांचे समुपदेशन केले तर प्रशासनाला मदत होईल, व कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणता येईल.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, स्थानिक पातळीवर तपासण्या होणार आहेत. त्यात कोणाला यायचे आहे, हे ही निश्चित आहे. तपासण्या वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अशा वेळी लोक स्वतःहून तपासणीसाठी येणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजात मान सन्मान व प्रतिष्ठा असलेले व ज्यांच्या शब्दाला मान आहे अशा लोकांनी समजावून सांगितल्यास निश्चितच प्रतिसाद वाढेल. तरी मौलवींनी व शिक्षक, मुख्याध्यापकांनी हे सहकार्य प्रशासनाला करावे. तसेच मास्क लावणे, वारंवार हात धुणे, घरात व बाहेरही सामाजिक अंतर राखणे याबाबत आपण स्थानिक पातळीवर लोकांना सांगत रहावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच कोविड केअर सेंटर येथे रुग्णांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात येते. त्याबद्दल आश्वस्त रहा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिक वाचा : मूर्तीजापुर तालुक्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री,प्रशासन प्रशासन लागले कामाला