नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांच्यासह भारत- रशिया संरक्षण सहकार्याचा मॉस्को इथे आज आढावा घेतला. व्यापार, आर्थिक व वैज्ञानिक सहकार्याबाबतच्या भारताबरोबरच्या अंतर सरकारी आयोगाचे बोरीसेव हे सहअध्यक्ष आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान यावरच्या उच्च स्तरीय समितीचेही ते संरक्षण मंत्र्यांसह सहअध्यक्ष आहेत. द्विपक्षीय सहकार्य व प्रादेशिक मुद्यांवर उभय नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक व फलदायी चर्चा झाली.
महामारीमुळे अनेक अडचणी उत्पन्न झाल्या असल्या तरी भारत- रशिया यांच्यातले विविध स्तरावरचे द्विपक्षीय संबंध उत्तम संपर्क राखून असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. भारत आणि रशिया यांच्यात विशेष व विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी असून संरक्षण संबंध हा त्याचा एक महत्वाचा स्तंभ आहे.
75व्या विजय दिनानिमित्त आयोजित संचलन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रशियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या निमंत्रणावरून राजनाथ सिंह 3 दिवसाच्या मास्को दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धातल्या 75व्या विजय दिनानिमित्त कार्यक्रमाला, रशियाच्या नागरिकांना, तसेच भारत आणि रशिया यांच्या सुरक्षेत योगदान देणाऱ्या दिग्गजांना संरक्षण मंत्र्यांनी विशेषकरून शुभेच्छा दिल्या.
याआधी सकाळी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी रशियाचे उपसंरक्षणमंत्री कर्नल अलेक्झांडर फोमीन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य व प्रादेशिक विकासाच्या मुद्यावर त्यांनी चर्चा केली.