नवी दिल्ली, 21 जून 2020: भारतीय रेल्वेने आपल्या सर्व कार्यात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यवसाय सुलभता वृद्धींगत करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या सध्याच्या खरेदी नियमांनूसार, अंकीत सुरक्षा तथा महत्वपूर्ण बाबी, जिथे गुणवत्ता महत्वपूर्ण असते, ती खरेदी अशा पुरवठादारांकडून केली जाते, ज्यांना त्या विशिष्ट घटकांसाठी पुरवठादार संस्थेने परवाना दिलेला असतो.
नुकत्याच घेतलेल्या निर्णयात भारतीय रेल्वेच्या कोणत्याही पुरवठादाराला विशिष्ट बाबींसाठी पुरवठादार संस्थेची मान्यता मिळाल्यास त्या पुरवठादाराला देशभरातील सर्व रेल्वे मंडळांच्या त्यासंबंधीच्या सेवांसाठी परवानगी मिळेल.
या निर्णयामुळे वेळेची बचत होईल तसेच रेल्वे विभागांकडून निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विविध पुरवठादार संस्थांशी संपर्क करण्याची आवश्यकता राहणार नाही, तसेच ही प्रक्रिया अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम होईल आणि सार्वजनिक खरेदीमध्ये स्पर्धा वाढेल.
यामुळे देशातील उद्योगांची निर्मिती क्षमता वाढेल तसेच ‘मेक इन इंडियाचे’ उद्दीष्ट साध्य होईल.
याअगोदर, एखाद्या संस्थेतील मान्यताप्राप्त पुरवठादाराला दुसऱ्या संस्थेत खरेदीसाठी पात्र समजले जात नव्हते आणि त्या पुरवठादाराच्या बाबतीत विचार करण्यासाठी विविध संस्थांकडे अनुमोदन प्राप्त करावे लागत होते. आता रेल्वेकडेही पारदर्शक पद्धतीने निवड करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.