नमस्कार,
सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आंतरराष्ट्रीय योगदिनाचा हा दिवस एकजुटतेचा दिवस आहे. हा विश्व बंधुत्वाच्या संदेशाचा दिवस आहे. मानवतेच्या एकरूपतेचा दिवस आहे. जो आपल्याला जोडतो, एकत्र आणतो तो योग आहे.जो अंतर दूर करतो तो योग आहे. कोरोनाच्या या संकटकाळात जगभरातील लोकांचा ‘माय लाईफ-माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत सहभाग हेच दर्शवतो की योगप्रति उत्साह किती वाढत आहे, व्यापक होत आहे.
मित्रांनो, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे “घरात कुटुंबाबरोबर योगसाधना करणे”. आज आपण सामूहिक कार्यक्रमांपासून लांब रहात घरीच आपल्या कुटुंबियांसमवेत योग करत आहोत. घरातील मुले असतील, तरुण मंडळी असतील, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे योगाच्या माध्यमातून एकत्र येतात तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होतो. म्हणूनच यावर्षी योगदिन जर मी दुसऱ्या शब्दांमध्ये सांगितले तर एक भावनात्मक योगाचा दिवस आहे. आपले कौटुंबिक बंध वृद्धिंगत करण्याचा दिवस आहे.
कोरोना महामारीमुळे आज जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गंभीरतेने पाहत आहे. जर आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या रोगावर मात करायला आपल्याला खूप मदत होते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगाच्या अनेक पद्धती आहेत. अनेक प्रकारची आसने आहेत, जी आपल्या शरीराची ताकद वाढवतात, चयापचय क्रिया ताकदवान बनवतात.
मात्र कोविड-19 विषाणू विशेषतः आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. आपली श्वसनयंत्रणा मजबूत करण्यासाठी ज्यातून सर्वात जास्त ताकद मिळते तो प्राणायाम आहे. प्राणायाम हा एकप्रकारचा श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे. साधारणपणे अनुलोम, विलोम आणि प्राणायाम सर्वात जास्त लोकप्रिय आहेत आणि खूप प्रभावी देखील आहेत. मात्र प्राणायामचे अनेक प्रकार आहेत यामध्ये शीतली, कपालभाति, भ्रामरी, भस्त्रिका यांचा समावेश आहे. आणखी देखील आहेत अगणित आहेत. याबाबत प्राणायाम करणाऱ्यांना जर तुम्ही भेटलात तर ते तुम्हाला अधिक माहिती देतील. अनेक प्रकार आहेत आणि आणखी विविध प्रकार यात समाविष्ट होत आहेत.
Greetings on #YogaDay! Sharing my remarks on this special occasion. https://t.co/8eIrBklnLI
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2020
योगसाधनेची ही सर्व तंत्रे आपली श्वसनसंस्था आणि प्रतिकारशक्ती मजबूत करायला खूप मदत करतात. म्हणून माझी तुम्हाला खास विनंती आहे कि आसने, योगाबरोबर प्राणायाम देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. अनुलोम, विलोमसह प्राणायामाची अनेक तंत्र आत्मसात करा. ती सिद्ध करा. योगाच्या या पद्धतींचा लाभ आज संपूर्ण जग घेत आहे, कोरोनाबाधित रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत, योगाच्या ताकदीमुळे या रोगावर मात करण्यासाठी त्यांना मदत मिळत आहे.
मित्रांनो, आत्मविश्वास आणि मनोबल वाढविण्या साठी योगाची मदत होत आहे. यामुळे आपण संकटांचा सामना करू शकतो, संकटावर विजय मिळवू शकतो. योगामुळे आपल्याला शांती मिळते, मानसिक शांती मिळते. संयम आणि सहनशक्ती देखील मिळते. स्वामी विवेकानंद म्हणायचे – “एक आदर्श व्यक्ती ती आहे जी नितांत निर्जनमध्ये देखील क्रियाशील राहते, अत्याधिक गतिशीलतेतही संपूर्ण शांतीचा अनुभव करते”.
कुठल्याही व्यक्तीसाठी ही खूप मोठी क्षमता असते. विपरीत परिस्थितीतही सक्रिय राहणे, थकून हार न मानणे, संतुलित राहणे या सर्व गोष्टी योगाच्या माध्यमातून आपल्या जीवनात स्थान प्राप्त करतात, आपल्या जीवनाला ताकद देतात. म्हणूनच, तुम्हीही पाहिले असेल, जाणवले असेल, योगाचा साधक कधीही संकटात धैर्य गमावत नाही. योगाचा अर्थ आहे – ‘समत्वम् योग उच्यते’ अर्थात अनुकूलता, प्रतिकूलता, यश-अपयश, सुख-संकट या सर्व परिस्थितीत समान राहणे, न डगमगणे हाच योग आहे.
मित्रांनो,
योग एका निरोगी ग्रहासाठीचा आपला शोध वाढवितो. एकतेसाठी एक शक्ती म्हणून योग उदयाला आले आहे आणि माणुसकीचे बंध तो अधिक मजबूत करतो. त्यात भेदभाव होत नाही. वंश, रंग, लिंग, विश्वास आणि राष्ट्रांच्या पलीकडे तो आहे.
कोणीही योगासने करू शकतो. यासाठी आपल्याला फक्त आपला थोडा वेळ आणि मोकळी जागा आवश्यक आहे. योग आपल्याला केवळ शारीरिक ताकदच देत नाही, तर आपल्यासमोर असलेल्या आव्हानांवर आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी मानसिक संतुलन आणि भावनिक स्थिरता देखील देत आहे.
जेव्हाही योगाच्या माध्यमातून समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, जगाचे कल्याण करण्याबाबत बोलत आहोत तेव्हा मी योगेश्वर कृष्ण यांच्या कर्मयोगाचे देखील तुम्हाला पुनःस्मरण करू देऊ इच्छितो-
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने योगाची व्याख्या करताना म्हटले आहे ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच कर्माची कुशलता हा योग आहे. कृतीतील कार्यक्षमता हा योग आहे. हा मंत्र सदासर्वदा आपल्याला शिकवतो, योगद्वारा जीवनात अधिक योग्य बनण्याची आपल्यात क्षमता निर्माण होते. जर आपण आपले काम शिस्तबद्ध रीतीने करीत असु, आपली जबाबदारी पार पाडत असु, तो देखील एक प्रकारे योग आहे.
मित्रांनो,
कर्मयोगाचा आणखी एक विस्तार आहे. आपल्याकडे म्हटले आहे
युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु।
युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा।।
म्हणजेच योग्य आहार, योग्य प्रकारे खेळणे, व्यायाम, झोपण्या-उठण्याच्या योग्य सवयी, आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे हाच योग आहे. याच कर्मयोगातून आपल्याला त्रास आणि समस्यांवर उपाय मिळतो. एवढेच नाही, आपल्याकडे निष्काम कर्म, कुठल्याही स्वार्थाशिवाय उपकार करण्याच्या भावनेला कर्मयोग म्हटले आहे. कर्मयोगाची ही भावना भारताच्या नसानसात भिनली आहे. जेव्हा गरज भासली तेव्हा भारताची ही निःस्वार्थ भावना जगाने अनुभवली.
जेव्हा आपण योग, कर्मभावना आचरणात आणतो, तेव्हा व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आपली ताकद अनेक पटीने वाढते. आज याच भावनेसह संकल्प करायचा आहे. – आपण आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. एक सजग नागरिक म्हणून आपण कुटुंब आणि समाज म्हणुन एकजूट होऊन पुढे जाऊया. घरी कुटुंबाबरोबर योग हा जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करूया. जर आपण हे केले तर नक्की यशस्वी होऊ. आपण नक्की विजयी होऊ. याच विश्वासासह पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना योगदिनाच्या शुभेच्छा.
लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु॥
ओम !!