अकोला,दि.१८- जिल्ह्यामध्ये तसेच शहरामध्ये कोविड १९ चा रुग्णामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी पॉझिटीव्ह रुग्णावर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटाची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, महात्मा फुले जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. अष्टपुत्रे डॉ. शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मुर्तिजापूर येथील बबन हॉस्पीटलचे बायस्कर, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूरचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचार देता येणे शक्य व्हावे म्हणून नॉन कोविड वार्डामधून किमान ५० खाटा कोविड रुग्णासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णाची चांगली व्यवस्था ठेवावी. यासाठी वैद्यकीय अधिकारी व पुरेसा स्टाफ उपलब्ध करुन द्यावा. मात्र कोविड रुग्णांची सोय करतांना नॉन कोविड रुग्णाची गैरसोय होणार नाही, यासाठी आरोग्य प्रशासनाने पुरेसे लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. महानगर पालिकेच्या घरोघरी सर्वेक्षणातून निदर्शनास आलेल्या जोखमीच्या रुग्णावर प्रभावीपणे औषधोपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या.
मुर्तिजापूर येथील बबन हॉस्पिटल अधिग्रहित
उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथे कोविड रुग्णासाठी ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गंत मुर्तिजापूर येथील बबन हॉस्पीटल हे कोविड रुग्णासाठी कोविड हेल्थ सेंटर म्हणून अधिग्रहित करुन तेथे ३० खाटाची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केले आहे.