अकोला,दि.१७- बाळापूर शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचे बाहेरील क्षेत्रात येणे जाणे होता कामा नये. संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून याबाबत दक्षता पाळणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत सर्व विभागांची काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज बाळापूर येथे दिले.
बाळापूर येथे सद्यस्थितीत कोरोना संसर्गित व्यक्तिंची संख्या वाढत असून त्यासंदर्भात शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री ना. बच्चू कडू हे बाळापूर येथे गेले होते. तेथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा बैठकही घेतली.
यावेळी बाळापूरचे आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, नगराध्यक्ष खतीब, जिल्हा रुग्णालयाच्या डॉ कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले , उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी सोळंके, तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी , गटविकास अधिकारी वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती भावना हाडोळे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती लांडे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. इशरत खान ,न.प. मुख्याधिकारी पवार, पोलीस निरीक्षक शिंदे, नायब तहसिलदार कौटकर, नायब तहसिलदार सोनवणे, न.प अभियंता सादिक अली, कथले, न प अभियंता देशमुख, मंडळ अधिकारी तेलगोटे , तलाठी नाकट, गजानन भागवत,खराटे ,बाळापूर शहरातील न. प. सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना. कडू म्हणाले की, पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष द्यावे. यातून कोणीही व्यक्ती आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जास्त जोखमीचे वा कमी जोखमीचे कोणतेही व्यक्ती असो ते प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. आरोग्य तपासणी करतांना ज्या व्यक्तिंचे पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन पातळी कमी असेल अशा रुग्णांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करा, अशा सुचनाही ना. कडू यांनी केल्या. बैठकीनंतर ना. कडू यांनी शेळद येथील कोविड केअर सेन्टर ला भेट देऊन तेथील सुविधाची पाहणी केली.