नवी दिल्ली, 17 जून 2020:
मित्रांनो,
भारत मातेच्या शूर पुत्रांनी गलवान खोऱ्यात आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.
देशसेवेत त्यांच्या या महान त्यागाबद्दल मी त्यांना नमन करतो आणि कृतज्ञतापूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
दु:खाच्या या कठीण काळात या हुतात्म्यांच्या कुटूंबियांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
आज संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे, देशाच्या भावना तुमच्या सोबत आहेत.
आमच्या हुतात्म्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
कोणताही प्रसंग असो, परिस्थिती काहीही असो, भारत पूर्ण ताकदीने प्रत्येक इंच भूमीसाठी देशाच्या स्वाभिमानाचे ठामपणे रक्षण करेल.
भारत सांस्कृतिकदृष्ट्या शांतता प्रिय देश आहे. आमचा इतिहास शांततामय राहिला आहे.
“सर्व लोक सुखी होवोत” ही भारताची विचारधारा आहे.
प्रत्येक युगात आम्ही संपूर्ण जगात शांतता आणि सर्व मानवांच्या कल्याणाची कामना केली आहे.
आम्ही नेहमीच आमच्या शेजाऱ्यांसोबत सहकार्या
आमचे मतभेद जिथे आहेत तिथे नेहमीच आम्ही प्रयत्न केला आहे की मतभेद वादात परिवर्तित होऊ नयेत, मतभेदांचे पर्यवसन वादात होऊ नये.
आम्ही कोणालाही कधी भडकवत नाही, पण आपल्या देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी आम्ही तडजोडही करीत नाही.
जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखविले आहे, आमच्या क्षमता सिध्द केल्या आहेत.
त्याग आणि संयम हा आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे, परंतु त्याच वेळी शौर्य आणि पराक्रम आपल्या देशाच्या चारित्र्याचा तितकाच महत्वाचा भाग आहेत.
मी आमच्या देशवासियांना आश्वासन देतो की आमच्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि कोणीही आम्हाला त्याचे संरक्षण करण्यापासून अडवू शकत नाही.
कोणालाही याबद्दल जरासुद्धा संभ्रम किंवा शंका असता कामा नये.
भारताला शांतता हवी आहे. पण भारताला चिथावणी देणाऱ्यांविरोधात कोणत्याही परिस्थितीत योग्य ती पावले उचलण्यात येतील.
आमचे सैनिक लढता लढता शहिद झाले याचा देशाला अभिमान आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो कि आपण दोन मिनिटे मौन पळून या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करूया.