हिवरखेड (प्रतिनिधी):- मान्सूनचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र पेरणीची धूम धाम असून बी बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी कृषी केंद्रांवर विक्रीसाठी जात असलेल्या अवैध खताच्या ट्रकवर कारवाई करीत ट्रक हिवरखेड पोलीस ठाण्यात जप्त केला आहे.
सविस्तर असे की 15 जून सोमवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार
दानापूर येथे वान नदीजवळ ट्रक क्रमांक MH 26 H 8111 मध्ये Geo green नावाचे सेंद्रिय खताच्या 50 किलो वजनाच्या 160 बॅक आढळल्या. परंतु त्याच्यावर परवाना क्रमांक छपाई केलेली नाही. बॅगवर उत्पादकाचा पत्ता मेसर्स नर्मदा पोल्युशन सर्व्हिसेस, पूर्णा सहकारी साखर कारखाना बाभळगाव, ता. वसमतनगर जि. हिंगोली आहे तर विक्रेता रॅलीज इंडिया लि. मुंबई छापलेले आहे. रॅलीज इंडिया कंपनीला सेंद्रिय खत विक्रीकरिता परवाना आहे परंतु त्यांच्या परवान्यात उत्पादक म्हणून मे. नर्मदा पोल्युशन सर्विसेस यांचे नाव रॅलीज इंडियाच्या परवान्यात समाविष्ट नसल्यामुळे अवैधरित्या सेंद्रिय खताचे उत्पादन करून विनापरवाना खताची वाहतूक व विक्री करण्याच्या आरोपाखाली तसेच शेतकऱ्यांना फसवण्याचा उद्देशाने खताचे उत्पादन पॅकिंग वाहतूक व विक्री केलेली असल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतासह ट्रक असा एकूण सोळा लक्ष रुपयांचा मुद्देमाल हिवरखेड पोलीस ठाण्यात जमा केला. कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी 1) रणजित प्रतापराव भंडारे रा. पुणे, 2) मॅनेजर मे नर्मदा पोल्यूशन सर्व्हिसेस बाभळगाव, जि हिंगोली, 3) गणेश बाबाराव कऱ्हाळे, 4) किसन मुकुंदराव सावंत रा. बोरीसावंत जि हिंगोली अश्या चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून चालक आणि सहाय्यक या दोघांना अटक केली आहे. हा अवैध खताचे बिल हिवरखेड येथील वृषाली कृषी सेवा केंद्र यांच्या नावे असून डिलिव्हरी दानापूर येथील सद्गुरू कृषी सेवा केंद्र येथे जात होता. अशी माहिती तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी दिली.
सदर कारवाईमुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खते खरेदी करताना अत्यंत दक्षता घेणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. ही धाडसी कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. जंजाळ मोहीम अधिकारी जि. प. अकोला, मिलिंद वानखडे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा, एन.एम. लोखंडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भरतसिंग चव्हाण गटविकास अधिकारी तेल्हारा, एन. व्ही. राठोड कृषी अधिकारी यांच्यासह कृषी विभागामार्फत करण्यात आली.