अकोला,दि.१५- जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवरुन दररोज १५०० या प्रमाणे लॉकडाऊनच्या कालावधीत दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळीचे वाटप झाले आहे. या लॉकडाऊनच्या दिवसांत दररोज गरजूंपर्यंत ही थाळी पोहोचविण्यात आली. त्यामुळे गोरगरिबांची भूक भागविता आली आहे,अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे.
जिल्ह्यात दि. २६ जानेवारी २०२० पासुन शिवभोजन थाळीची सुरूवात झाली. अकोला शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर व सर्वोपचार रूग्णालय या दोन ठिकाणी २०० थाळी प्रतिदिन क्षमतेचे शिवभोजन केंद्र कार्यान्वित झाले,अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान कोव्हिड- १९ च्या उद्भवलेल्या संकटामुळे शासनाने शिवभोजन थाळी वाढीव इष्टांक दिला, त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नविन शिवभोजन केंद्र १ एप्रिल पासुन सुरु करण्यात आले. अकोला शहरातही शासकीय स्त्री रूग्णालय येथे शिवभोजन केंद्र सुरु झाले. या सर्व केंद्रावरून दररोज १५०० याप्रमाणे दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळीचा लाभ लॉकडाऊन कालावधीत देण्यात आला,अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली. विशेष म्हणजे कोव्हिड- १९ च्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आलेल्या खदान व अकोट फैल या परिसरात अनुक्रमे १०० व २०० शिवभोजन थाळीचे वितरण प्रतिदिन करण्यात येत आहे, अशीही माहिती देण्यात आली.
शासनाच्या या योजनेचा लाभ लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील गोरगरिब व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अकोला येथे तीन बार्शिटाकळी येथे तीन, तेल्हारा येथे दोन, मुर्तिजापुर येथे दोन तसेच अकोट बाळापूर व पातूर येथे प्रत्येकी एक या प्रमाणे १३ शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेतअशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे.