अमरावती, दि. 15 : कोविड- 19 साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधासाठी विविध दक्षता घेत असताना मानसिक आरोग्याची प्रत्येकाने जपणूक करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विविध आवश्यक व नव्या बाबींचा उहापोह करण्यासाठी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ई- कॉन्फरन्स महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.
अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘कोविड 19 साथीच्या काळात मानसिक व शारीरीक आरोग्याची जपणूक’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स ‘झूम’च्या माध्यमातून झाली. त्याला शुभेच्छा देताना देताना महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे यांनीही परिषदेला शुभेच्छा व्यक्त केल्या. मलेशिया येथील सेन्स विद्यापीठातील स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसचे उपअधिष्ठाता डॉ. हैरूल अनुअर हाशिम, अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील डॉ. दिलशाद अहमद, सिनेट सदस्य डॉ. प्रदीप खेडकर, संस्थेचे विश्वस्त जगदीश सारडा, प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे, समीर बिजवे, डॉ. अंजली ठाकरे, डॉ. तनुजा राऊत, डॉ. महेश खेतमाळीस, डॉ. रत्नेश शाह, डॉ. सिंकू कुमार सिंग यांच्यासह विविध तज्ज्ञ या सेमिनारमध्ये सहभागी झाले होते.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाच्या साथीने जवळजवळ संपूर्ण जग व्यापले आहे. या महासंकटाचा खंबीरपणे मुकाबला केल्यास जग त्यातून निश्चितपणे बाहेर पडेल. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी सुदृढ शरीरासह खंबीर मनही असणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अवलंबासह प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम, चांगला आहार, संयत जीवनशैली व मानसिक आरोग्यासाठी योगाचा अवलंब केला पाहिजे.
कोरोना प्रतिबंधासाठी स्वच्छतेसह सोशल डिस्टन्स पाळणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या संकटकाळात मन खंबीर ठेवून अडचणींवर मात करण्याचे धैर्य बाळगले पाहिजे. खचून जाता कामा नये. त्यासाठी क्रीडा व योग यांचा अवलंब हा ताणतणावांचे निरसन करणे, शरीर व आरोग्य सुदृढ ठेवणे यासह नेतृत्व गुणांच्या विकासासाठीही उपयुक्त ठरतो. त्यांच्या अवलंबाने साहस, नेतृत्व, चिकाटी गुणांचाही विकास होतो. त्यामुळे त्याचा अंगीकार केला पाहिजे. या अनुषंगाने विविध संकल्पना पुढे येण्यासाठी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ई-परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या डॉ. बीना राठी, डॉ. चारूतानंद केदार, इंदल जाधव, अनिकेत भुयार, नविता मालाणी, डॉ. संगीता जवंजाळ, डॉ. प्रदीप वाकोडे, गोपाल बागडी, भास्कर म्हसाळ, प्रशांत नांदुरकर, सतीश बेलसरे, नरेश साईखेडे, सुनील कु-हेकर, डॉ. सत्येंद्र गडपायले, सुदेश मोरे, डॉ. नितीन सराफ, गजानन नांदुरकर, अशोक पिंजरकर, डॉ. नंदकिशोर पाटील यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. डॉ. अजय गुल्हाने, डॉ. हरीश काळे, डॉ. विनोद कपिले, डॉ. श्याम दळवी, डॉ. सुरेंद्र चौहान, डॉ. राजेश कुमार आदींचा सल्लागार समितीत समावेश होता.