अकोला,दि.१२- सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा केली जाते. मात्र काही तपशिल चुकीचा असल्याने सन २०१६-१७ व १७-१८ या शैक्षणिक वर्षातील काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचा तपशिल तात्काळ दुरुस्त करुन दि.१७ पर्यंत सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय यांनी केले आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी परीक्षा फी चे प्रदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने (NEFT मार्फत ) जमा करण्यात येते. मात्र काही विद्यार्थ्यांची सन २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीतील शिष्यवृत्तीची रक्कम तसेच काही महाविद्यालयाची शिक्षण फी परिक्षा फी ची रक्कम खाते क्रमांक, आयएफएस कोड चुकीचा नोंदविल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे जमा होऊ शकलेली नाही. अशा जमा न झालेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमा, विद्यार्थ्यांची नावे व महाविद्यालयाची नावे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत संबंधीत विद्यार्थ्यांना / महाविद्यालयांना वेळोवेळी कळविण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील प्राचार्यांच्या आढावा सभेमध्ये सुद्धा लिखित स्वरूपात महाविद्यालयनिहाय विद्यार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात आल्या होत्या. तरीही काही महाविद्यालयांनी याची खात्री करून विद्यार्थ्यांचे/ महाविद्यालयाचे बँक खाते क्रमांक, आयएफएस कोड सह दुरूस्त करुन सुधारित यादी या कार्यालयाकडे अद्यापही सादर केल्या नाहीत.
तरी अशा महाविद्यालयांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशिल दुरूस्त करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाकडे बुधवार दि. १७ जुन पर्यंत सादर करावा. अन्यथा या कार्यालयाचे बँक खात्यात शिल्लक असलेली रक्कम शासनखाती जमा करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची व महाविद्यालयाची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.