अकोला,दि.१२- राष्ट्रिय आरोग्य अभियानाअंतर्गत अकोला परिमंडळात आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मानधन तत्वावर ही पदभरती होणार असून या संदर्भात निवड प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात कोणत्याही उमेदवारास कोणाकडूनही कॉल करुन पैशांची मागणी करुन नियुक्ती देण्याचे अमिषास बळी पडू नये, अशा भुलथापा देणाऱ्यांपासून सावध रहा असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक अकोला मंडळ डॉ. आर. एस. फारुकी यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर, अधिपरिचारीका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांच्या कंत्राटी स्वरुपाच्या पदांची मानधनतत्त्वावर पदभरती करण्यासाठी दि. १६ एप्रिल रोजी www.akola.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात देऊन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पदांसाठी पाच हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन पदनिहाय पात्र अर्जांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन दोन दिवस तक्रारी व अर्जांमधील दुरुस्त्यांसाठी वेळ देण्यात आला होता. सद्यस्थितीत मागणीनुसार यादीतील गुणवत्तेनुसार नियुक्ती आदेश देणे सुरु आहेत.
मात्र काही दिवसांपासून या पदांच्या भरतीबाबत उमेदवारांना दूरध्वनीद्वारे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी पैसे घेऊन नियुक्ती आदेश देण्याची बतावणी केली जात आहे. या संदर्भात आरोग्य विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की, ही भरती प्रक्रिया संपुर्णतः पारदर्शक पणे राबविण्यात येत असून कोणत्याही उमेदवाराने कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नये. गुणानुक्रमांक व आवश्यकतेनुसारच जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनेच नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत, असे डॉ. आर.एस. फारुकी यांनी कळविले आहे.